डेंग्यू

प्रश्न- सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू या आजाराचा प्रार्दूभाव झाल्याचं आढळत आहे. डेंग्यू फैलावण्याची कोणती कारणं सांगता येतील ?

उत्तर- डेंग्यू या आजाराचा ताप हा विषाणूंमुळे पसरतो. हा विषाणुजन्य ताप असून चार प्रकारचे विषाणू असतात, डेन वन, डेन टू, डेन थ्री आणि डेन फोर. हा विषाणुजन्य आजार असल्यामुळे औषधे, लस, इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे डेंग्यू ताप पसरु नये याबाबत काळजी घ्यावी लागेल. एडिस डासाची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेऊन डेंग्यूचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी. 

प्रश्न- डेंग्यू या आजाराची लागण नेमक्या कोणत्या ऋतूत होते ?

उत्तर- हा आजार पावसाळा संपत आल्यावर ते हिवाळा सुरु होताना होते. तापमान आणि आर्द्रता असणाऱ्या वातावरणात डेंग्यूचे विषाणू आढळतात. साचलेल्या पाण्यावर, उष्णता आणि आर्द्रता पोषक असल्याने डेंग्यूचे विषाणू वाढत जातात. 

प्रश्न- डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नेमकी कोणती आहेत ? 

उत्तर- डेंग्यू आणि चिकुनगुनिया पसरवणारा ईडिस इजिप्ट डास, मलेरिया पसरवणारा ॲनाफेलिस डास, याची घराच्या अवतीभवती उत्पत्ती होते. यासाठी घरात डेंग्यूच्या डासाला उत्पत्ती स्थान उदा. झाडाच्या कुंड्यात साचलेले पाणी, एसी मधून बाहेर पडलेलं पाणी, देवापुढे ठेवलेले नारळ, कोंब आलेले नारळ, प्लास्टीकच्या भांड्यात साठवून ठेवलेले पाणी यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. झोपडपट्टीत पाणी साठवून ठेवणाऱ्या ठिकाणी, ड्रम मध्ये डेंग्यूचं वसतीस्थान असतं. विहीरीत साचलेच्या पाण्यात गप्पी मासे सोडले जातात. जेणेकरुन डेंग्यूच्या अळ्या हे मासे खातात. 

प्रश्न- डेंग्यू झाला आहे याची प्राथमिक लक्षणं काय सांगता येतील ?

उत्तर- डेंग्यू तापाला हाडमोडे ताप संबोधलं जातं. उदा. हाडात होणाऱ्या वेदना, अंगदुखी, काहीवेळा अंगावर पुरळ येणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणं जाणवल्यास प्रथम स्वत: कोणतेही औषध न घेता वैद्यकीय सल्ला घेणं खूप हितकारक असत. वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्त तपासणी करणं देखील आवश्यक आहे. यानंतरच डेंग्यूचा प्रादूर्भाव झाला आहे की नाही हे समजते. डेंग्यूचा डास दिवसा चावतो. 

प्रश्न- डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी ? 

उत्तर- डेंग्यू साठी ठोस औषध नसल्यामुळे जी लक्षणं निदर्शनास येतात त्या लक्षणांसाठी औषधोपचार करावा. आराम करणं खूप महत्त्वाचं आहे. शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये. वैद्यकीय सल्ला आणि विविध चाचण्या करुन औषधे घ्यावी. 

प्रश्न- डेंग्यू होऊ नये म्हणून काही प्रतिबंधक उपचार आहेत का ?

उत्तर- डेंग्यूवर प्रतिबंधक लस आहे, पण त्याची सर्वतोपरी चाचणी होऊन ती भारतात 2015 पर्यंत पोहोचेल. लस वापरल्यानंतरच त्याच्या उपयुक्ते विषयी आपण बोलू शकतो. 

प्रश्न- डेंग्यू या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणती उपाययोजना केली आहे ? 

उत्तर- डेंग्यूच्या डासाची घरात आणि घराच्या अवती-भवती उत्पत्ती होत असल्याने यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. त्यामुळे महापालिकेने, शासनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत रेडिओ, बेस्ट बसेसच्या माध्यमातून तसेच घरोघरी पोस्टर्स वाटले जात आहेत. रेल्वे, होर्डिंग्ज, रॅली याच्या माध्यमातून जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन डास उत्पत्ती स्थानांबाबत जनजागृती करीत आहेत. नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये याच्या सूचना दिल्या जात आहेत. जेणेकरुन डेंग्यू या आजाराला आळा बसून मोठ्या प्रमाणात यश येईल अशी खात्री आहे.