महाराष्ट्र-विकास संकल्पनेची पुनर्मांडणी


महाराष्ट्र-विकास संकल्पनेची पुनर्मांडणी
प्रकाश पवार
महाराष्ट्राचा विकास साठीच्या दशकाप्रमाणे किंवा नव्वदीच्या दशकाप्रमाणे करता येणार नाही. एकूण संदर्भ बदलले आहेत. त्या बदललेल्या संदर्भांत महाराष्ट्रातील विकासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. सविस्तर विश्‍लेषण.
-----------
भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्या आणि भूभाग या दोन्ही दृष्टिकोनातून मोठे राज्य आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत चांगले आहे. हरयाना आणि गुजरात यांच्याप्रमाणे दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचेदेखील अव्वल स्थान होते (2004-2013). महाराष्ट्रातील विकासाची संकल्पना मल्टिडायमेंशनल आहे. मानव विकास अहवालानुसार समावेश वाढ ही संकल्पना मध्यवर्ती मानली गेली आहे. या चौकटीमध्ये महाराष्ट्राचा विकास दिसतो. एव्हाना वंचित, गरीब आणि दुर्लक्षित यांचा समावेश मुख्य प्रवाहात करण्याचा त्यामध्ये अंर्तभाव आहे. असे असूनही महाराष्ट्र राज्याच्या पुढे विकास संकल्पनेचे आव्हान आहे. कारण विकास संकल्पना किंवा दृष्टी ही एकच नाही; बहुविचार आणि भिन्नता या संकल्पनेमध्ये ती आहे. त्यामुळे या संकल्पनेचे घटीत बहुआयामी स्वरूपाचे असते. भिन्नतेला आंशिक मान्यता दिलेली असते. ल्युशियन पाय, आमंड-पॉवेल, रस्टोव, हण्टिंग्टन, आइजेन्सटाई, ओरगेस्की यांनी विकासाचा अर्थ लावताना भिन्नतेला आंशिक मान्यता दिलेली दिसते. एव्हाना विकासाचे विविध कंगोरे आहेत. मात्र रस्टोव यांनी स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या ग्रंथात विकास म्हणजे वाढ यावर भर दिला आहे. नव्वदीनंतर दरडोई उत्पन्नात वाढ, बाजारपेठेचा विस्तार, पर्यायी गुंतवणूक, व्यक्तिगत गुतंवणूक अशा विवक्षित गोष्टीभोवती महाराष्ट्राची विकासाची संकल्पना बंदिस्त झाली आहे. या चित्रामधील विकासाची संकल्पना खुली करण्याची गरज आहे. विकासाची संकल्पना महाराष्ट्राच्या संदर्भात कशी भिन्नतेचा पुरस्कार करण्यास भाग पाडते; तसेच ग्रामीण विकासातील द्वंद्व, शहरी विकास द्वंद्व, विभागीय समतोलाचे द्वंद्व, विविध क्षेत्राचा विकास, सांस्कृतिक विकास, भागीदारी आणि संस्थात्मक विकास, राजकीय संस्था केंद्रित निर्णय निश्‍चिती या चौकटीमध्ये महाराष्ट्रातील विकासाची चर्चा इथे केली आहे. एव्हाना या विकास संकल्पनेचा संबंध मानवी हक्काशीदेखील संबंधित आहे. महाराष्ट्राचा विकास साठीच्या दशकाप्रमाणे किंवा नव्वदीच्या दशकाप्रमाणे करता येणार नाही. एकूण संदर्भ बदलले आहेत. त्या बदललेल्या संदर्भांत महाराष्ट्रातील विकासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे.

ग्रामीण विकासातील द्वंद्व संकल्पना
ग्रामीण-शहरी द्वंद्वांपेक्षा ग्रामीण भागामधील द्वंद्वं विकासाच्या संदर्भात जास्त नीटनेटकेपणे समजून घेतली पाहिजेत. कारण ही द्वंद्वे नवीन विकास संकल्पनेची दिशा सूचित करत आहेत. ग्रामीण भागातील द्वंद्वं आणि विकास यांचा संबंध पाच मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट होतो. एक, 2011 च्या जनगणना अहवालानुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे (54.8 टक्के). विशेषतः मराठवाडा (72.9 टक्के) आणि विदर्भ (64.9 टक्के) येथे ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. विशेष म्हणजे विदर्भात अनुसूचित जमातीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या तुलनेत 32.1 टक्के आहे. याचा अर्थ सर्व ग्रामीण भाग समान नाही. म्हणून ग्रामीण विकासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. दोन, सरासरी पातळीवर विकास दिसतो. मात्र ग्रामीण भागामध्ये स्तरीकरणापेक्षाही अंतरविसंगती मोठी उदयास आली आहे. विकास आणि अविकासाची परस्परविरोधी टोके निर्माण झाली आहेत. या दोन्ही गटांमधील अंतर कमी करणे हा विकासाचा मुख्य मुद्दा दिसतो. उदा. शेतमजूर, छोटे शेतकरी आणि शेतकरी अशी वर्गरचना ग्रामीण महाराष्ट्रात दिसते. ग्रामीण भागात ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कामगारवर्ग शेतीवर काम करणारा आहे. सरासरी शेतीचा आकार 1.66 हेक्‍टर एवढा छोटा झाला आहे. पाण्याखालील क्षेत्र केवळ 18.9 टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवर पाण्याखालील क्षेत्र 42.9 टक्के आहे. म्हणजे महाराष्ट्र पाण्याखालील क्षेत्रामध्ये राष्ट्रीय प्रमाणाच्या निम्म्यापेक्षाही खाली आहे. तर केंद्रीय पाणी आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतील 100 तालुके कमी पावसाचे दिसून आले. म्हणजे एक तृतीयांश महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. यावरून शेतीक्षेत्रामध्ये विकास आणि अविकास अशी परस्परविरोधी द्वंद्वं उदयास आली आहेत. ही द्वंद्वं नवीन विकासाची रणनीती आखण्याची मागणी करते. तीन, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात चाळीस ते शेहेचाळीस टक्के गरिबीचे प्रमाण आहे. म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात एका बाजूला 47,051 एवढे दरडोई उत्पन्न दिसते; तर 29.60 टक्के ग्रामीण भागात गरिबीदेखील दिसते. हे दोन्ही आकडे राष्ट्राच्या तुलनेत जास्त आहेत. मतितार्थ- गरिबी आणि दरडोई उत्पन्न राष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे

साप्ताहिक सकाळ मधील प्रकाश पवार यांचा लेख

Labels: , , , , ,