राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली असून या नाविन्यपूर्ण आरोग्यदायी योजनेत 30 विशेषज्ज्ञांचा 972 आजारांचा व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. कमी उत्पन्न गटांच्या कुटुंबांवर आरोग्यसेवेचा प्रचंड खर्चाचा बोझा कमी व्हावा, या उद्देशाने जीवनदायी आरोग्य योजना सुरू आहे. या योजनेविषयी माहिती देणारा हा लेख...
गरीब कुटुंबाचा आरोग्यसेवेचा त्यांच्या कुटुंबांवर होणारा प्रत्यक्ष खर्च कमी होईल आणि आरोग्यसेवेबाबतच्या आर्थिक आपत्तीपासून त्यांना संरक्षण मिळेल. जागतिक मानकाप्रमाणे कुटुंबांचा एकूण आरोग्य खर्चाच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी खर्च खिशातून व्हावा असा नियम आहे. तथापि भारतात हा खर्च आरोग्यखर्चाच्या 71 टक्क्यांपर्यंत आपत्ती काळात करावा लागतो.

योजनेची वैशिष्ट्य 
• ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा सर्व कुटुंबांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळेल.
• शासकीय रुग्णालयांनी पूर्ण दक्षता घेऊन सक्रिय सहभाग घ्यावा.
• यावर या योजनेत भर देण्यात आला असून शासकीय रुग्णालयांचा स्तर उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
• लाभार्थीला कोणत्याही प्रकारचा खर्च न करता वैद्यकीय सहाय्य उपलब्ध होऊन तातडीच्याप्रसंगी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.
• गरजेनुसार दवाखान्यात दाखल करुन शस्त्रक्रिया/उपचारात्मक सेवा पुरविण्यात येते.
• दारिद्रयरेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक, 1 लाख रुपयांपेक्षा एकत्रित वार्षिक उत्पन्न कमी असणारे केशरी रेशनकार्डधारक, अंत्योदय तसेच अन्नपूर्णा   लाभार्थी या योजनेस पात्र आहेत.
• कुटुंबातील सर्व सदस्यांच्या छायाचित्रासह आरोग्यकार्ड वितरीत करण्यात येणार आहे.
• कुटुंबातील सदस्यांना गरजेनुसार मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळतील.
• रुग्णास तपासणी, औषधे, भोजन, परीक्षण व रोगनिदान, शस्त्रक्रिया/अन्य क्रिया, उपचारासाठी पाठपुरावा, वैद्यकीय उपचार, एकेरी प्रवास खर्च, गुंतागुंती (निर्माण झाल्यास) उपचार याचा यात समावेश करण्यात आला आहे.
• प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबांचा विमा हप्ता शासन भरणार आहे.

योजनेतील उपचार पद्धती व आरोग्य सेवा
• सर्वसामान्य शस्त्रक्रिया.
• कान-नाक-घसा शस्त्रक्रिया.
• डोळ्यांची शस्त्रक्रिया.
• स्त्रीरोगशास्त्र व प्रसूतीशास्त्र यांच्या शस्त्रक्रिया.
• अस्थिव्यंग शास्त्राच्या शस्त्रक्रिया व उपचार.
• बालरोगाच्या शस्त्रक्रिया.
• जनन व मूत्र संस्थेच्या शस्त्रक्रिया.
• मेंदूच्या शस्त्रक्रिया.
• कर्करोगाच्या शस्त्रक्रिया.
• कर्करोग औषधोपचार.
• कर्करोगावर किरणोपचार.
• गंभीर भाजणे.
• गंभीर अपघात.
• कृत्रिम अवयव प्रत्यारोपण.
• आपत्कालीन सेवा.
• सर्वसाधारण औषधोपचार.
• संसर्गजन्य आजार.
• बालरुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन.
• हृदयरोग.
• मूत्रपिंडाचे आजार.
• मज्जासंस्थांचे आजार.
• फुफ्फुसांचे आजार.
• त्चचारोग.
• संधीवात.
• आंतरस्त्रावग्रंथींचे आजार.
• पोटाचे आजार व उपचारात्मक किरणोपचार.

शासनाच्या आरोग्य विभागाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेवर अंतर्गत रुग्णालयांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, रुग्णालयातील 25 टक्के खाटा या योजनेसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवणे, सप्ताहातून एकदा आरोग्य शिबीर आयोजित करणे, स्वागत व नोंदणी यासाठी वेगळी व्यवस्था, आंतर-रुग्णांना विनामूल्य भोजन, चहा-नाश्ता देणे, स्वतंत्र वैद्यकीय समन्वयक, शिबीर समन्वयक नेमणे आवश्यक, आरोग्य मित्रासाठी दर्शनी भागात जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, डिजीटल कॅमेरा, वेबकॅम आणि 2 एमबीपीएस कनेक्टीव्हीटी ह्या सोयी पुरविणे, रुग्णांचा उपचारानंतर 10 दिवस विनामूल्य पाठपुरवठा करुन त्यास मार्गदर्शन करणे व वैद्यकीय तपासणी करणे, रुग्णाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी न करणे, आंतररुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर परतीचा एसटी भाड्याचा प्रवासाचा खर्च देणे, शस्त्रक्रिया केली नसली तरी विनामूल्य मार्गदर्शन, तपासणी इत्यादी.

रायगड जिल्ह्यात दोन शासकीय रुग्णालये व सहा खाजगी रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. 20 हजारापेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.